कराड | सुपने आरोग्य केंद्रातर्गत आरेवाडी (ता. कराड) येथे उपकेंद्र मंजूर आहे. येथे सुसज्ज इमारत असलेले आरोग्य उपकेंद्रे अनेक दिवसा पासून रस्ता नसल्याने बंद स्थितीतआहे. या उपकेंद्राची ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे.
सुपने- तांबवे जिल्हा परिषद गटात आरेवाडी येथे असलेल्या आरोग्य उपकेंद्रास साजुर, आरेवाडी, गमेवाडी, पाठरवाडी, उत्तर तांबवे ही गावे जोडली आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब, गरजु नागरिकांना अल्पखर्चात आरोग्य सुविधा निर्माण व्हावी, म्हणून शासनाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली व आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. त्यापुढे जावून शासनाने गावातील लोकांना आरोग्य सुविधा लवकर मिळावी, म्हणून चार- पाच गाव एकत्रीत करुन उपकेंद्र निर्माण केली आहेत. या अंतर्गत आरेवाडी येथील उपकेंद्र मंजूर असून तेथे जवळची चार गावे जोडली आहेत.
आरेवाडी गावकऱ्यांनी येथे इमारत उभारली व उपकेंद्र सुरू केले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी उपकेंद्रात जाणेसाठी रस्ता दिला होता. मात्र, आता तो रस्ता बंद असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधा उपकेंद्र असून मिळत नाही. येथे नोकरीसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही तेथे जाऊन दिले जात नाही. यामुळे या भागातील आरेवाडी, गमेवाडी, साजुर, उत्तर तांबवे व पाठरवाडी गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नाही. स्थानिकांनी उपकेंद्राकडे जाणारा अडवलेला रस्ता खुला करावा. अन्यथा ते उपकेंद्र ज्या गावात जागा उपलब्ध आहे. तेथे स्थलांतरित करावे, अशी मागणी होत आहे.
लोकांची गैरसोय टाळावी – विजय चव्हाण
आरेवाडी येथे उपकेंद्र असून केवळ स्थानिकांनी वाट अडविल्याने त्यांचा उपयोग होत नाही. त्यामुळे मी खा. श्रीनिवास पाटील, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी कराड यांच्याकडे निवेदनद्वारे रस्ता उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. तेव्हा शासकीय यंत्रणेने योग्य तो निर्णय घ्यावा आणि लोकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण यांनी केलेली आहे.