सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील दुर्गम अशा धावली गावातील रस्ता अतिवृष्टीमुळे खचून गेला आहे. त्यामुळे वरची धावली (जुंगटी धावली) या गावांचा धावली गावाशी संपर्क तुटला असून वाहतूकही ठप्प झाली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दुर्गम अशा भागात ठिकठिकाणी दरडी कोसळत असून काही ठिकाणी रस्ता खचत आहे. त्यामुळे गावांचा संपर्कही तुटत आहे. काल अतिवृष्टीचा फटका धावली गावास बसला. या गावातील मुख्य रस्ता खचल्यामुळे त्याचा जळकेवाडी, कात्रेवाडी, भांबवली या गावाशी संपर्क तुटला. कास पठारावरून शेवटच्या टोकावर धावली गाव असून या गावासह परिसरातील गावामध्ये पावसाळ्याच्या दिवसांत एसटी वाहतूक ही बंद असते.
त्यामुळे येथील गावकऱ्यांना दूध वाहतूक करणाऱ्या गाडीवरच अवलंबून राहावे लागते. जंगल परिसर असल्याने हिंस्र प्राण्यांचा वावर या भागात असतो. मात्र, काल झालेल्या अतिवृष्टीत धावली गावचा रस्ता खचल्याने शहराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासनाने लक्ष घालून रोजच्या दळणवळणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.