रस्ता गेला चोरीला…ग्रामस्थांचे बायकापोरांसह साताऱ्यात रस्त्यावर आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
रस्ता आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही. भ्रष्ट ठेकेदार, अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत जांभळेघर ग्रामस्थांनी गायी, म्हैशी, शेळ्य़ा, बकऱ्यांसह बायकापोरांसह जिल्हा परिषदेच्या समोर सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते हे आक्रमक झाले होते. दरम्यान, सातारा पंचायत समितीचे अभियंता पाटील यांनी शिष्टाई करत लगेच आंदोलनस्थळी भेट आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्याने दुपारी आंदोलन स्थगित करण्यात आले.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी जांभळेघर रस्त्याची अगोदर सगळी माहिती घेतली. त्याबाबत पत्रकार परिषद घेवून माध्यमासमोर रस्ताच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस आणला होता. तरीही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने त्यांनी जांभळेघर ग्रामस्थांच्या विचाराने आंदोलनाचा निर्धार केला. आणि जांभळेघर ग्रामस्थ आपल्या गायी, म्हशी बकऱ्या घेवून त्यांच्या चारापाण्यासाठी गुरुवारी सकाळीच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर पोहचले. बाहेर फुटपाथवर तेथे गुर बांधली. महिला, पोर सगळी त्या प्रवेशद्वाराच्या गेटवर थांबून जोरदारपणे प्रशासनाचा निषेध सुरु करु लागले. सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेतील एकेक अधिकारी येवू लागले तेव्हा आंदोलनाची माहिती मिळाली. तोपर्यंत सातारा पोलिसांची चांगलीच पळापळ झाली होती.

पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांना वारंवार आंदोलन मिटवून घ्या, म्हणून विनंती करत होते. परंतु त्यांनी न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. या आंदोलनाची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने लगेच सातारा पंचायत समितीतील अभियंता पाटील यांना मिळाली. पाटील हे कार्यालयात पोहचण्यापूर्वी आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी तब्बल अर्धातास सकारात्मक चर्चा केली. सकारात्मक चर्चेनुसार आंदोलन स्थगित करण्यात आले.