कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली; चेअरमन व सभासदांमध्ये जोरदार खंडाजंगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोयना कॉलनीतील प्रियंका प्ले हाऊस बंद करण्याचा ठराव रद्द करून नव्याने मान्यता देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेला स्थानिक नागरिक व गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांनी ठाम विरोध केला. सभेस मृत सभासदांच्या वारसांना प्रवेश नाकारल्याने झालेल्या गोंधळात सभा रद्द करण्यात आली. यावेळी चेअरमन शिवाजी चव्हाण आणि सभासदांच्या वारसांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली.

दरम्यान,  मृत सभासदांच्या वारसांचे सभासद नोंदणी करता सोसायटीकडे तीन महिन्यांपूर्वी अर्ज आल्याचे सचिव नितीन सांडगे यांनी मान्य केले. मग सभासद नोंदणी का करून घेण्यात आली नाही यावर मात्र ते निरुत्तर झाले. त्यामुळे चेअरमन शिवाजी चव्हाण हे जाणीवपूर्वक सभासदांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणून मनमानी कारभार करत आहेत. हुकूमशाही वृत्तीने सहकारी सेवा सोसायटीमध्ये कारभार हाकत आहेत. याला आमचा ठाम विरोध असल्याचे सांगत स्थानिक नागरिक व सदस्यांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा वाद टळला.

कोयना सहकारी दुध पुरवठा संघाच्या सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची दि. १६ मे रोजी विशेष सभा येथील आशीर्वाद बंगल्यात आयोजित केली होती. येथे सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस हे बंद करण्यात यावे, या मागणीसाठी येथील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांपर्यंत थेट तक्रारी केल्या आहेत. शिवाय प्रशासनाकडेही धाव घेतली आहे. त्या अनुषंगाने आजच्या  सभेला विशेष महत्त्व होते. या सभेमध्ये संबंधित प्ले हाऊसला स्थलांतरित करण्याचा ठराव रद्द करून नव्याने मान्यतेचा ठराव देण्यासंबंधी विचार विनिमय होणार होता, यालाच स्थानिक नागरिकांसह सभासदांचा मोठा विरोध होता. या अनुषंगाने गेल्या आठ दिवस या विषयावर सातत्याने वाद, विवाद, चर्चा आणि प्रबोधन अशा पद्धतीचा मोहीम सुरू होती.

दरम्यान, सोसायटीचे संचालक पारवे व चेअरमन शिवाजी चव्हाण यांच्यात प्ले हाऊसच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला पोहोचला. एकमेकांना शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याच्या चर्चेने वातावरण अधिकच चिघळले. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सभेला पोलीस बंदोबस्त देण्यात आला. सभेच्या वेळेत कॉलनीतील नागरिक व सदस्यांनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातीपासूनच पोलीस प्रशासनाने आपली भूमिका बजावत सोसायटीची ही सभा सोसायटीतील नागरिक, सभासद की संचालक यापैकी कोणाची आहे, याची खातरजमा केली. दरम्यान, काही सभासदांनी आम्ही सदस्य आहे. आमचे वडील सदस्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर सदस्य नोंदणीसाठी आम्ही अर्ज केले आहेत. सोसायटीची फी भरतो. सोसायटीच्या सर्व अटी-शर्तीचे आम्ही पालन केलेले आहे, असे असतानाही आम्हाला या सभेमध्ये प्रवेश नाकारण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करत प्रवेशाची मागणी केली. यावेळी मात्र चेअरमन चव्हाण यांनी फक्त नोंदणी असलेल्या सभासदांना प्रवेश दिला जाईल, अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका घेताच वादाला तोंड फुटले.

उपस्थित नागरिकांनी आम्ही मूळ फाउंडर मेंबर आहे. आमचे सदस्य मृत झाले असलेतरी आम्ही वारसा हक्काने सदस्य आहोत. तसे नोंदणीची मागणी ही आम्ही तीन महिन्यापूर्वी केली आहे. याची खातरजमा करून मृत सदस्यांच्या वारसांना या सभेमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी लावून धरली. मात्र, अशा कोणालाही प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका चेअरमन यांनी पुन्हा घेतल्याने वाद चिघळला. त्यानंतर सोसायटीमधील अनेक बारीक-सारीक वाद, विवाद, तंटे भ्रष्टाचार यावर एकमेकांवर चिखल फेक करण्यात आली. पोलिसांनी सातत्याने मध्यस्थीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेअरमन आपल्या भूमिकेवर ठाम तर सदस्य सभासद व वारस आपल्या भूमिकेवर ठाम त्यामुळे अखेर ही सभा रद्द करण्यात आल्याची घोषणा सचिव  सांडगे यांनी केली.