हृदयविकाराने धक्क्याने जीव जातानाही एसटी चालकाने 25 प्रवाशांना वाचविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

एसटी बसच्या एका चालकाने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपले कर्तव्य बजावल्याचे चित्र पहायला मिळाले. लष्करातील जवान ज्या पध्दतीने आपल्या जीवाची बाजी लावतात, त्याचप्रमाणे एका एसटी चालकाने प्रवाशांचा जीव वाचविला आहे. वसई- म्हसवड या बसचे चालक जालिंदर रंगराव पवार असे या चालकाचे नाव आहे. बसमधील 25 प्रवाशांना सुरक्षित करत आपला जीव सोडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई-म्हसवड ही एसटी बस (एमएच- 14 बीटी- 3341) दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट स्थानकावर आली, तेव्हा चालक बदलला, त्यानंतर ही बस बदलण्यात आली. जालिंदर रंगराव पवार यांनी गाडी चालवायला सुरुवात केली आणि बस म्हसवडला निघाली. पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ बस पोहोचली असता, तिचा वेग अचानक कमी झाला. बसचा वेग कमी होताच त्याचा साथीदार संतोष गवळी त्याच्याजवळ आला आणि त्याने बस कमी का केली, अशी विचारणा केली. तेव्हा पवार यांचा चेहरा घामाने भिजला होता आणि त्यांना चक्कर येत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढ्या असह्य वेदना होऊनही त्यांनी बसच्या स्टेअरिंगवरून ताबा न गमावता हळू हळू बस रस्त्याच्या डाव्या बाजूला वळवून ती सुरक्षित स्थळी आणली. त्यावेळी त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांनी स्टेअरिंगवर डोके ठेवले.

बसचालक जालिंदर पवार त्यांना घेण्यासाठी सहकारी संतोष गवळी केबिनमध्ये पोहोचले आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उठले नाहीत. त्यानंतर एका प्रवाशाने बसचा ताबा घेतला आणि तातडीने 25 प्रवाशांसह बसला जवळच्या नसरापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात नेण्यात आले. चालकाला हृदयविकाराचा झटका आला असावा, असे एसटीतील सर्व प्रवाशांना वाटले, त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बसचालक जालिंदर पवार यांचा मृत्यू झाला.