अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई
भारतीय नौदलात तब्बल नऊ वर्ष प्रामाणिक सेवा दिल्यानंतर केवळ एका चुकीसाठी नौदल अधिकाऱ्याने घराचा रस्ता दाखविलेल्या मधुकर रामचंद्र धंदर यांच्या कुटुंबियांची वाताहत झाली. दरिद्री आणि नैराश्याचे जीवन जगत असलेल्या धंदर कुटुंबापुढे आता केवळ आत्महत्येचा पर्याय शिल्लक उरला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील रहिवासी आहेत मधुकर रामचंद्र धंदर.१९६१ मध्ये त्यांना नौदलात कुक बॉय म्हणून नोकरी लागली. नऊ वर्ष नऊ महिने त्यांनी प्रामाणिक सेवा दिल्यानंतर १९६९ मध्ये मधुकर धंदर यांचा त्यांच्या सहकार्यासोबत क्षुल्लक वाद झाला. केवळ एका क्षुल्लक कारणासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांनी मधुकर धंदर यांना घरचा रस्ता दाखविला मात्र या प्रकरणावरून तब्बल पन्नास वर्षे उलटून गेलीत, धंदर यांना त्यांच्या विभागामार्फत आजवर काहीच सहकार्य करण्यात आले नाही.आधीच हलाकीच्या परिस्थितीत असलेल्या मधुकर धंदर यांनी शासनासोबत पाठपुरावा करून जागा देण्याची मागणी केली, त्यांना जागा देण्याचे आदेश देण्यात आले मात्र अद्यापही प्रशासनाने काहीच हालचाल न केल्याने दारिद्र्यात खितपत पडलेल्या धंदर कुटुंबीयांनी मृत्यूला जवळ करण्याचा निर्णय घेतला परंतु येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आता त्यांना धीर दिलाय, धंदर यांच्या लढाईत ते सुद्धा सामील झालेत.
सध्या राहतात ते घर देखील त्यांच्या मोठ्या भावाने बक्षीस म्हणून दिले. झोपडी वजा घर असल्याने मधुकर धंदर यांच्या मुलाला स्थळ येत नसल्याची खंत ही त्यांनी बोलून दाखविली.जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांनी अद्याप त्यांच्या पेन्शन चा मार्ग मोकळा केला नाही त्यामुळे त्यांच्या मरणानंतर त्यांना शासन लाभ देणार काय असा प्रश्न उपस्थित होतोय.