औरंगाबाद – जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात आलेला आहे. तरी सुद्धा नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना संबंधी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपन भूमरे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सीजनचा पुरेसा साठा, व्हेंटीलेटरची उपलब्धता या सर्व बाबतीत जिल्ह्यातील यंत्रणेने अधिक सक्षमतेने कार्य केलेले आहे. याबरोबरच लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करावे. तसेच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका हा लहान मूलांना असू शकतो, या तज्ज्ञाच्या अंदाजानुसार आरोग्य विभागांनी बालरोग तज्ज्ञ आणि त्यांच्या विशेष ऑक्सीजन बेडची उपलब्ध सुविधा यावर समाधान व्यक्त केले.
यावेळी डॉ. कानन येळीकर यांनी प्रसुतीसाठी अतिरिक्त 200 क्षमतेच्या विभागाचा प्रस्ताव शासनास सादर केला असून याबाबत मान्यता मिळाली तर मराठवाड्यातील जोखीम स्थितीतील महिलांची प्रसूती सुरक्षित करण्यात साह्यभूत ठरेल, असे सांगितले. यावर प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली. तसेच आगामी काळात, गौरी गणपती, नवरात्र सण उत्सव तसेच लग्न समारंभ आणि सभासंमेलनात गर्दी होणार नाही. याबाबत पोलीस प्रशासनास सूचित केले. या बैठकीच्या प्रस्ताविकात डॉ. गव्हाणे यांनी संगणकीय सादरीकरणाव्दारे कोविड विषयक केलेला तयारीचा आढावा पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत सादर केला.