औरंगाबादेत थंडीचा उच्चांक; शहराचे तापमान मोठ्या प्रमाणावर घसरले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – उत्तरेकडील शीतवाऱ्यांच्या प्रभावामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे आज सकाळी शहराचे तापमान मोठ्या प्रमाणावर घसरले. औरंगाबाद शहरात आज सकाळी साडे सहा वाजता किमान तापमान 7.3 अंश सेल्सियसपर्यंत घसरले. मागील तीन दिवसांपासून शहराच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. कालच्या पेक्षा आज तापमानाचा पारा आणखी एक अंश सेल्सियसने घसरला आहे. औरंगाबादसह मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांतील तापमानातही घट झालेली दिसून आली.

उत्तरेकडील शीत वाऱ्यांची लाट महाराष्ट्रात दाखल झाल्याने दिवस आणि रात्रीचे तापमान निचांकी पातळीवर घसरले आहे. हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच औरंबादचे तापमान 7.3 अंशावर घसरले आहे. शहराच्या कमाल तापमानातही 6 अंशांनी घसरण झाल्याची नोंद झाली आहे. हे तापमान 23 अंश सेल्सियस पर्यंत घसरल्याचे दिसून आले.

आठवड्याच्या सुरुवातीला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धुळीच्या वादळाने धडक दिली होती. त्यामुळे कोकण ते गुजरातपर्यंतचा पट्टा धुळीने झाकोळून गेला होता. तर दुसरीकडे उत्तर भारतात हिमवृष्टी सुरु आहे. तेथील अतिशीत वारे खेचून आणण्यासाठी आपल्याकडे पोषक वातावरण तयार झाल्याने आता ही थंडीची लाट पसरली आहे. मागील वर्षी 17 जानेवारी 2020 रोजी शहराचे तापमान 8.1 अंश सेल्सियसवर पोहोचल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली होती. यंदा 27 जानेवारील प्रथमच 7.3 अंशांची नोंद झाली आहे. मागील वर्षी औरंगाबाद शहराचा पारा दहा अंश सेल्सियसच्या खाली गेला नव्हता.