औरंगाबाद | सोयगाव आगाराच्या एसटी चालक वाहकाच्या प्रसंगावध नामुळे बसमधून चोरीस गेलेल्या अडीच लाखाचा पर्दाफाश झाला. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे शुक्रवारी दुपारी बाराच्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.बंदोबस्तावर असलेले पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलांनी बसमधून प्रवास करणाऱ्या शिवना येथील जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापक यांच्या पाच लाख रुपयांच्या रकमेतून अडीच लाख चोरले होते.
याविषयी अधिक माहिती अशी की, सोयगाव आगाराच्या बस क्र.एम.एच १४ बीटी २१६६ मधून सिल्लोड येथे बँक व्यवस्थापक दत्तात्रय कदम बँकेची पाच लाखाची रक्कम घेऊन अजिंठा कडे जाण्यासाठी निघाले. त्यांच्या वर पाळत ठेवून पाच महिला त्याच ठिकाणाहून पुढील प्रवासासाठी बसल्या. त्यापैकी दोन महिला या कदम यांच्या बाजूस बसल्या होत्या. त्याचवेळी कदम यांच्याकडे अससलेल्या पिशवीतून सुतळी धाग्याने बांधलेल्या अडीच लाखाच्या नोटांचे बंडल या महिलांनी मोठ्या शिताफीने काढून घेत, गोळेगाव येथील उंडणगाव अनवा चौफुलीवर उतरून पोबारा केला. बसच्या चालक वाहकांना या महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या, म्हणून त्यांनी प्रवाश्यांना आपापल्या वस्तू तपासून घेण्याचे सांगितले. त्यावेळी कदम यांच्याकडे असलेल्या पाच लाखापैकी अडीच लाख गायब झाल्याचे निदर्शनास आले.
संशयास्पद हालचालीमुळे त्या महिलांनी चोरी केल्याचा संशय बळावला. एसटीचे चालक नरेंद्र लहासे व वाहक जयराम सुर्यवंशी यांनी आरडाओरड केल्याने त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलीस नाईक रविकिरण भारती त्यांचे सहकारी साबळे यांच्यासह सरपंच गणेश बनकर, उपसरपंच अनिल बनकर, शंकर जाधव यांच्या मदतीने या महिलांना अडीच लाखाच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. बीट जमादार राकेश आव्हाड यांनी सदरील महिलांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश आव्हाड हे करीत आहेत.