तत्कालीन मठाधिपतीस 7 वर्षे सक्तमजुरी शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | येथील मारुतीबुवा कराडकर मठाच्या विश्वस्तांच्या डोक्यात विना घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीरावमामा कराडकर याला न्यायालयाने दोषी धरुन सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. रविकांत तु. साखरे यांनी मंगळवारी ही शिक्षा ठोठावली. बाजीराव भागवत जगताप (वय- 37, रा. कोडोली, ता. कराड) असे बाजीरावमामचे मुळ नाव आहे.

सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरातील मारुतीबुवा मठाचे विश्वस्त व अध्यक्ष यशवंत दाजी माने हे 23 एप्रिल 2019 रोजी मठामध्ये असताना. बाजीरावमामा कराडकर हा आरडाओरडा करीत त्याठिकाणी आला. त्याने तेथे असलेल्या लाकडी विना उचलून घेतला. तसेच दिंडी कशी काढता ते बघतो, असे म्हणत तेथील लोकांशी वाद घातला. त्यावेळी मठाचे अध्यक्ष यशवंत माने यांच्याकडे पाहून तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत त्याने विना त्यांच्या डोक्यात घातला. त्यामध्ये यशवंत माने हे गंभीर जखमी झाले. मठात असलेल्या मोहन चव्हाण व अशोक शिंगण यांनी त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात बाजीरावमामा कराडकर याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. किर्दत व उपनिरीक्षक भरत चंदनशिवे यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षिदार तपासले. त्यापैकी दोन साक्षिदार प्रत्यक्षदर्शी साक्षिदार होते. तसेच डॉक्टरांची साक्षही महत्वपुर्ण ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी बाजीरावमामा कºहाडकर याला या गुन्ह्यात दोषी धरुन सात वर्ष सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला अ‍ॅड. ऐश्वर्या यादव, अ‍ॅड. संध्या चव्हाण व अ‍ॅड. कोमल लाड यांनी सहकार्य केले.