औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक परिसरात झांशीची राणी उद्यान परिसरात तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. हा स्तंभ 210 फूट उंचीचा असल्याने जोरदार वाऱ्यामुळे ध्वजाचे कापड फाटत आहे. त्यामुळे ठराविक वेळीच ध्वज फडकविला जात होता. पण आता व्यापारी, उद्योजक व सेवाभावी संस्थांनी ध्वजासाठी लागणारा निधी देण्यास सहमती दर्शविल्याने येत्या 26 जानेवारीपासून नियमितपणे म्हणजेच वर्षाचे 365 दिवस ध्वज फडकत राहणार आहे.
क्रांती चौक परिसरात झांशीची राणी पुतळा परिसरात ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभाची उंची 210 फूट एवढी आहे. याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी अनेक नागरिक याठिकाणी जमून सेल्फी घेतात. या ध्वजस्तंभाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सीएमआयए उद्योजक संघटनेद्वारे केले जात होते. दरवर्षी देखभाल दुरुस्तीवर किमान एक लाखापेक्षा तर ध्वजासाठी 90 हजार रुपयांचा खर्च येतो. स्तंभ उभारताना याठिकाणी तिरंगा वर्षातील बाराही महिने फडकविण्याचे नियोजन होते. मात्र, स्तंभाची उंची अधिक असल्याने हवेचा वेग जास्त आहे. त्यामुळे ध्वजाचे कापड वारंवार फाटत आहे. त्यामुळे सीएमआयएने जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने हा ध्वज वर्षातून पाच वेळा म्हणजेच 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर व दिवाळी सण अशा पाच महत्त्वाच्या दिवशीच ध्वज फडकविण्याचा निर्णय घेतला.
मात्र, आता वर्षभर हा ध्वज फडकविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी चव्हाण यांनी घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ध्वज समिती व उद्योजक, व्यापारी, सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात उद्योजकांना ध्वजासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. त्यावर उपस्थितांनी सहमती दर्शविली. त्यानुसार ध्वजासाठी निधी दिला जाणार आहे. त्यानुसार येत्या 26 जानेवारीपासून वर्षभर हा ध्वज फडकत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.