Sunday, January 29, 2023

ट्रक मालकासह तिघांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून लोखंडी गजाने मारहाण

- Advertisement -

कराड | ट्रक चालकाला शिविगाळ, दमदाटी का केली, असे विचारल्याच्या कारणावरून पाचजणांनी ट्रक मालकासह त्याच्या भावाला आणि मित्राला लोखंडी गजाने मारहाण केली. शहरातील मार्केट यार्ड गेट क्र. १ समोर बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

साहील आलम मुजावर (वय २४, रा. मंगळवार पेठ, कराड) याने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरुन रंगाप्पा भिमशा नाटेकर (वय ४९), शांताबाई रंगाप्पा नाटेकर (वय ४५), शरणू रंगनाथ नाटेकर (वय २८), संतोष रंगनाथ नाटेकर यांच्यासह अन्य एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील साहील मुजावर याचा ट्रक व्यवसाय असून त्याच्या ट्रकवर लक्ष्मण नामक चालक कामास आहे. लक्ष्मण याचा आर्थीक कारणावरून रंगाप्पा नाटेकर याच्याशी जुना वाद आहे. या वादातूनच बुधवारी सायंकाळी रंगाप्पा याने लक्ष्मणला शिविगाळ, दमदाटी केली. ही बाब समजल्यानंतर साहील मुजावर याच्यासह त्याचा भाऊ आबीद आणि मित्र ओंकार नितीन पवार हे तिघेजण रंगाप्पा नाटेकर याला जाब विचारण्यासाठी गेले.

त्यावेळी नाटेकर त्याच्या घरासमोर उभा होता. चालकाला दमदाटी का केली, असे तिघांनी विचारल्यानंतर रंगाप्पा याच्यासह अन्य पाचजणांनी या तिघांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून लोखंडी गज, लाकडी काठी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये तिघेही जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. हवालदार सुनील पन्हाळे तपास करीत आहेत.