सातारा | दहिवडी जवळील खांडसरी चौकात कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर होऊन दोन तुकडे झाले. याप्रकरणी कार चालकाला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अविनाश तोरसे (वय- 22, रा. पिंगळी खुर्द) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, साताराहून गोंदवलेकडे कार (क्र. एम. एच. 15, सीटी 2351) निघाली होती. दहिवडी व पिंगळी खुर्दलगत असणार्या खांडसरी चौकात कार व दुचाकीची (क्र. एम. एच. 11, बीएच- 3934) समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकीचे दोन तुकडे झाले असून दुचाकीचालक अविनाश तोरसे (वय 22, रा. तोरसेवस्ती पिंगळी खुर्द) हा युवक जागीच ठार झाला. अविनाश हा एकुलता एक असून त्याच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्याचे वडील व तो रोज एकाच दुचाकीवरून कामावर येतात. मात्र, गुरुवारी कामावर जाण्यासाठी मुलगा पुढे निघाला होता. कामावर जातानाच काळाने त्याच्यावर घाला घातला. या दुर्दैवी घटनेने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघात प्रकरणी कार चालक शैलेश रवींद्र ठाकूर (वय 44, रा. नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सपोनि अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास पोलिस उपनिरीक्षक जी. एम. दोलताडे करत आहेत. दरम्यान, सातारा ते लातूर व नगर ते सांगली हे दोन्ही हायवे खांडसरी चौक येथे मिळतात. या रस्त्यावरील चौकात कोठेही गतीरोधक नसल्याने येथे वारंवार अपघात होत आहेत. तातडीने येथे गतीरोधक बसवावेत, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करु, असा इशारा सरपंच विजय जाधव यांनी दिला आहे.