Monday, January 30, 2023

मायलेकाचा ओढ्याच्या पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू, इतर दोघांना वाचविण्यात यश

- Advertisement -

औरंगाबाद | आई मुलाचा ओढ्याच्या पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली असून दोघांना वाचवण्यात यश आले आहे. हे कुटुंब औरंगाबादेतील सातारा भागात राहत होते.

औरंगाबादेतील एक कुटुंब नातेवाईकांकडून कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना अचानक ओढ्याला पूर आल्याने हा प्रकार घडला. कार मधील चौघेजण पाण्यात वाहून गेले. या मधील दोघांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले असून मायलेकाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे औंढानागनाथ परिसरात शोककळा पसरली आहे. कार्यक्रम निमित्त हे परिवार गावी गेले होते परतत असताना ही घटना घडली.औरंगाबाद येथील सातारा परिसरात राहणारे योगेश पडोळ हे पत्नी वर्षा, मुलगा श्रेयस व त्यांचे नातेवाईक रामदास शेळके चौघे जण कार ( एम एच २० सीएम १८७२) ने औंढा तालुक्यातील शेळके (पोटा ) येथे कार्यक्रमासाठी आले होते. येथे कार्यक्रम आटोपून ते कोंडसी (असोला) मार्गे औरंगाबादला निघाले.

- Advertisement -

यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे ओढ्याला पुर आलायावेळी चालक योगेश यांना ओढ्याला आलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांनी कार पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने कार पुढे जात नव्हती. त्यामुळे गाडीतील चौघेही खाली उतरले मात्र पाण्याचा लोंढा अधिक गतीने आल्याने योगेश, वर्षा व श्रेयस व रामदास पाण्यात वाहून गेले,पोहत बाहेर निघाले. योगेश एका झाडाला अडकले ते त्यातून बाहेर पडले. मात्र वर्षा आणि श्रेयस पाण्यात वाहून गेले. त्यानंतर रामदास आणि योगेश यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली गावकऱ्यांनी ही घटना हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक गजानन मोरे यांना कळविली त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले. मात्र अधिक उशीर झाल्याने आज सकाळी हे शोध कार्य सुरू झाले. ओढ्याच्या काठावर वर्षा व श्रेयस या दोघांचे मृतदेह सापडले. दरम्यान, घटनास्थळी तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे आदी उपस्थित होते.