बीड | सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले असल्याने, शेतकरीवर्ग बियाणे खरेदीसाठी लगबग करत आहे. मात्र कृषी केंद्र चालकाकडून बियाणांची कृत्रिम टंचाई करत, बियाणांची चढ्या भावाने विक्री केली जात आहे. त्यामुळे बीडच्या माजलगावमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. बुधवारी कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत शेतकरी कामगार पक्षाने अनोखे आंदोलन केले.
कोरोनाच्या संकटात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांसमोर आता खरीप हंगामाच्या पेरणीचं आव्हान निर्माण झाले आहे. त्यात कृषी केंद्र चालकाकडून बियाण्यांची कृत्रिम टंचाई करून जादा दराने बियाणे विकली जात आहेत. मात्र या चढ्या भावाने बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई न करता, माजलगाव तालुका कृषी अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत.असा आरोप करत शेकाप नेते भाई मोहन गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका कृषी अधिकार्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून, कार्यालयासमोर अधिकाऱ्यांच्या नावाने बोंबा मारो आंदोलन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यात चढ्या भावाने बी-बियाणांची विक्री केली तर शेतकऱ्यांना अजून जास्त अडचणी निर्माण होतील. त्यामुळे शेतकरी आणि शेकापच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.