गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या

0
63
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | केडंबे (ता. जावळी) येथे बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या महिलांनी अडवल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी ग्रामस्थ व महिलांनी येथील एका महिलेविरुद्ध तक्रार देत संबंधित अत्याचाराचा आरोप खोटा असून ग्रामस्थ व युवकांची नाहक चौकशी करू नये, अशा मागणीचे निवेदन दिले.

बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस उपअधीक्षक शीतल खराडे, मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा आज केडंबेत दाखल झाला होता. पोलिस तपास करत असताना अचानक केडंबे येथील महिला आक्रमक होत रस्त्यावर हुज्जत घालत पोलिसांच्या गाड्या अडवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

केडंबे येथील सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या पोलिसांच्या गाड्यांसमोर गावातील महिलांनी ठिय्या मांडला. केडंबेत बाल अत्याचार गुन्ह्यांत आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून तपासासाठी आलेल्या पोलिसांच्या गाड्यांसमोर महिलांनी ठिय्या मारल्याने व महिलांचा आक्रमकपणा वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी महिलांनी अत्याचाराचा आरोप खोटा आहे, असे म्हणत त्या महिलेविरुद्ध घोषणाही दिल्या. यावेळी शीतल खराडे यांनी ध्वनिक्षेपकावरून ग्रामस्थ व महिला यांना शांततेचे आवाहन केले. शीतल खराडे यांनी जमावाला शांत करत ग्रामस्थ व महिलांचे म्हणणे ऐकून घेऊन ग्रामस्थांनी दिलेले निवेदन स्वीकारून तपास योग्य प्रकारे करण्याचे आश्वासन दिले.

पोलिसांना निवेदन

पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक महिला गेले चार ते वर्षांपासून केडंबे येथील आपल्या भावाच्या घरात राहत असून तिची वर्तणूक चांगली नाही. ती गावातील युवकांना बिघडवण्याबरोबर भांडणेही लावत आहे. तिने जाणीवपूर्वक एका लहान मुलीला व तिच्या आजीला पैशाचे आमिष दाखवून काही लोकांवर गैरभावनेतून गुन्हा दाखल केला, असून अशा प्रकारचा गुन्हा गावात घडलाच नाही. त्यामुळे या महिलेवर कायदेशीर कारवाई करावी. आजपासून गावातील कोणत्याही व्यक्तीला व लहान मुलांना चौकशीसाठी बोलावू नये.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here