हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IPL सुरू होण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आला आहे. दरवर्षी आयपीएल स्पर्धेच्या काळात आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या संघांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळते. मात्र यातच कोल्हापुरात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या चाहत्यांमधील वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या महेंद्रसिंह धोनी विरुद्ध रोहित शर्मा असा वाद रंगला आहे. याच वादातून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे धोनीच्या एका चाहत्याला शेतात नेऊन चोप मार दिल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी या घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी याने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर धोनीच्या काही चाहत्यांनी डिजिटल फलक लावून त्याचे आभार मानले होते.
यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्याच्या चाहत्यांनीही कुरुंदवाडीमध्ये डिजिटल फलक लावले. त्यामुळे कुरुंदवाडीत एमएस धोनी विरुद्ध रोहित शर्मा असे युद्ध सुरु झाले होते. अशातच एका चाहत्याने विरोधी गटाच्या डिजिटल फलकावर ब्लेड मारला. यानंतर शाब्दिक बाचाबाची होऊन हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर हे प्रकरण अजून तापण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’