कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपालिकेचा 24 बाय 7 पाणी प्रश्न आता चांगलाच पेटलेला आहे. कराडमधील सर्व नागरिकांनी याबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली. कराडमध्ये 24 बाय 7 या पाणी योजनेअंतर्गत कराडकर यांच्या नळ कनेक्शनना मीटर बसवण्यात आलेत आणि त्यानंतर आलेल्या बिलांमुळे कराडकरांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. हा प्रश्न सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी उचलून धरला. त्यासोबत सामान्य नागरिकांनीही या प्रश्नाबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनांची बरसात केली. सुरुवातीला सोपा वाटणारा हा प्रश्न अधिक गंभीर बनत गेला आणि त्यानंतर याला श्रेयावादाच्या राजकारणाची किनार दिसू लागली.
मुख्याधिकारी यांनी सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कराडमधील विविध पक्षाचे नेते माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले पाणी प्रश्नाबाबत मत व्यक्त केले. मात्र, कोणताच निर्णय होत नसल्याने बैठकीच्या काही कालावधीनंतर गोंधळास सुरुवात झाली. त्याच वेळी यामध्ये यशवंत विकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांनी बिल आकारणीच्या प्रश्नाला स्थगिती आणल्याचं पत्र सभागृहात दाखवलं. यानंतर मात्र, गोंधळ अधिकचा वाढला. मुख्याधिकारी याबाबत कोणतीच भूमिका घेत नसल्याने अनेकांनी नाराजीचा सूर आवळत सभागृह सोडले. यानंतर पाणी बिल आकारणास स्थगिती मिळवळेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते राजेंद्रसिह यादव यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. यादरम्यान माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, काॅंग्रेसचे झाकिर पठाण, मनसेचे सागर बर्गे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, संजय चव्हाण यांनीही आपली भूमिका मांडली.
कोण काय- काय म्हणाले…
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, चावडीवर सभा बोलावून कशासाठी पाण्यावरून गाव पेटवताय. मुख्याधिकारी यांना या प्रश्नावर निर्णय घेता येणार नाही, असे वाटले तेव्हा आम्ही सकाळी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलो. आम्ही आमची भूमिका मांडली, त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ स्थगिती दिली. सदोष यंत्रणा राबविल्याशिवाय कराडकरांना पाणीपट्टी आकारून दिली जाणार नाही.
फारूक पटवेकर म्हणाले, सर्वात अगोदर जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही गेलो. श्रेयवाद कोणी घेत असेल अन् या मतदार संघातील प्रतिनिधीचा कोणी अवमान करत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही. मुख्याधिकारी यांनीही सांगितले की, जिल्हाधिकारी यांचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फोन झाला असून नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, हे नंतर सांगितले. आम्ही श्रेयवादासाठी नाही, लोकांच्या हितासाठी लढतोय.
अशोकराव पाटील म्हणाले, आम्ही दीड वर्षापासून पाणीपट्टी विषयावर आवाज उठवतोय. आता काम पूर्णत्वाकडे आल्याने अनेकजण श्रेय घेण्यासाठी उड्या मारू लागले आहेत.
यानंतर ज्यांच्या शिष्टमंडळाला मुख्याधिकाऱ्यांनी 15 टक्के सूट दिल्याचे आश्वासन दिलं होतं त्या लोकशाही आघाडीच्या नेत्यांना संपर्क केला. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न राजकारण विरहित कराडकरांच्या हिताचा व्हावा असे सांगितलं. एकूणच मुख्याधिका-यानी बोलावलेल्या आजच्या बैठकीत पाणी प्रश्न चांगलाच गाजला जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकारी बैठकीसाठी या प्रश्नासंदर्भात गेले असून नेमका कराडकर यांच्या फायद्याचा निर्णय या बैठकीत होतो की नाही हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.