उद्घाटनापुर्वीच बियर शॉपीला महिलांनी ठोकले टाळे

Bear
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सोसायटीतील नागरिकांचा विरोध झुगारून सुरू होणाऱ्या कासलीवाल तारांगण फाट्यावरील करण बिअर शॉपी ला उद्घाटनापूर्वी संतप्त महिलांनी टाळे ठोकले. महिलांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर छावणी पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत केले.

पडेगाव-मिटमिटा परिसरातील कासलीवाल तारांगण हाऊसिंग सोसायटीच्या रस्त्यालगत भास्कर वास्तू येथील व्यावसायिक गाळ्यांमध्ये मेडिकल, महिलांचे वस्त्र दालन, इलेक्ट्रिक व केश कर्तनालय अशी दुकाने आहेत. या दुकानालगत करण बिअर शॉपी बुधवारी सुरू करण्यात येणार होती. मात्र, या परिसरातील महिलांनी बिअर शॉपी ला विरोध केला होता. याबाबत निवेदन देऊन हे दुकान सुरू करू नये अशी मागणीही केली होती. मात्र, निवेदनाला न जुमानता बुधवारी बिअर शॉपी चे उद्घाटन होणार होते.

बिअर शॉपी मुळे महिला, मुली, विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुकानाचा फलक काढून टाकत बाटली फोडून दुकानाला टाळे ठोकले.