औरंगाबाद | लग्न जमत नसल्याने नैराश्यात येऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आली आहे. मुज्जफर मोबीन इनामदार, वय – 24 ( रा. मुकुंदवाडी गाव) असे युवकाचे नाव आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मुज्जफर याची पत्नी चार वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. पत्नीशी भांडण झाल्यामुळे दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर मुजफ्फरचा पुनर्विवाह करण्यासाठी कुटुंबीय मुलीच्या शोधात होते. मात्र मुलगी भेटत नव्हती, यामुळे मुजफ्फर नैराश्यात आला होता.
यामुळे त्याने सहा ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबाला समजल्यानंतर त्यांनी त्याला घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याबाबत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.