मंगल कार्यालयात लग्नात युवतीने दागिण्यावर व आहेरावर मारला डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
शेंद्रे (ता. सातारा) येथील मंगल कार्यालयात लग्नाची धामधूम सुरू असताना एका युवतीने दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली. तिने चक्क 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. आहेराचे सुमारे रोख 1 लाख रुपयेही लांबवले. सदरची चोरीची घटना दि. 4 रोजी घडली असून, याप्रकरणी सोनल राहुल पवार (वय- 34, रा. शाहूनगर, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका कार्यालयात विवाह कार्य असल्याने त्या दिवशी गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेऊन अनोळखी युवतीने नवऱ्या मुलाच्या खोलीमधून 30 हजारांचे सोन्याचे पदक, 15 हजारांचे झुमके, 15 हजारांची सोन्याची अंगठी, 30 हजारांची सोन्याची चेन, 15 हजारांचे कानातले वेल, 15 हजारांचे कानातले टॉप, 15 हजारांची अंगठी, चांदीचे करंडे, चांदीची गणपतीची मूर्ती व आहेराचे सुमारे रोख 1 लाख रुपये असा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

संबंधित ऐवज तक्रारदार यांच्याकडे असताना संशयित युवतीने गर्दीचा गैरफायदा घेऊन पोबारा केला. याबाबतची घटना समोर आल्यानंतर माहिती घेण्यात आली. संशयित अनोळखी युवती असल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.