उरमोडी नदीपात्रातून युवक वाहून गेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सातारा तालुक्यातील नागठाणे येथे नदीपात्रातून एक युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोज सुधाकर गडकरी (वय- 28) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. अद्याप वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागलेला नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागठाणे येथे उरमोडी नदी आहे. या नदीपात्रातून एक युवक वाहून गेला. सध्या परिसरात मोठा पाऊस कोसळत असल्याने गेल्या दोन दिवसापूर्वी उरमोडी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. तसेच पावसाचेही पाणी नदीत आल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वेगाने वाहत आहे. या वाढलेल्या पाण्यात मनोज गडकरी हा युवक वाहून गेला आहे.

या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मचले घटनास्थळी दाखल झाले. रविवारीपासून बोरगाव पोलिसांनी शोधमोहीम राबवली आहे. या घटनेची फिर्याद अद्याप बोरगाव पोलिसांत दाखल झाली नाही. पोलीस संबंधित युवकाचा नदीपात्रात शोध घेत आहेत. तसेच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.