कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील धरणग्रस्तांच्या शेतीला पाणी, मुलांना पाच टक्के नोक-या, निर्वाहभत्ता, येत्या मे महिन्यापर्यंत जर मिळाला नाही तर मुंबईत मंत्रालयासमोर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र जमा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे. कराड येथील पलाश मंगल कार्यालयात डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमिक मुक्ती दलाचा वार्षिक महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी श्रमुदचे राज्य कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र दळवी, पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, मोहन अनपट, चैतन्य दळवी, महेश शेलार, अॅड शरद कांबळे, राजन भगत, मनिषा जाधव, डि. के. बोडके, मालोजीराव पाटणकर, काँम्रेड जयंत निकम, श्रीपती माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भारत पाटणकर पुढे म्हणाले, कोविड नंतर महामेळावा होत आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ ग्रस्तांनी संघर्ष करून दाखवला. समन्यायी पाणीवाटपाचा आटपाडी तालुक्यात यशस्वी प्रयोग केला. यामुळे भुमिहीन माणसांना शेतीला पाणी देण्याचा कायदेशीर हक्क मिळाला. समन्यायी पाणीवाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर लागू करा, यामुळे येथील माणूस पाण्याविना राहणार नाही. कुणाला गुलामगिरी करायला नको. कोल्हापूर, शिराळा, कराड तालुक्यात समान पाणीवाटप चळवळ सुरु झाली आहे. बंदिस्त पाईपलाईन करून पाणी मिळणार आहे, हे श्रमिक मुक्ती दलाने करून दाखवले. दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी देण्याची सुरवात झाली आहे. पाणी कुणाच्या बापाच नाही, आजचा मेळावा आमचा यशाचा उत्सवाचा जल्लोषाचा मेळावा आहे. जगात पाण्याची चळवळ श्रमिक मुक्ती दलामुळे सुरू झाली, पालक म्हणून स्त्रीयांना अधिकार मिळवून दिला. गोरगरिबांच कडून जमीनी घेऊन पवनचक्क्या उभारल्या. त्यातून कंपनीने कोट्यवधी रुपये कमावले, एका मेगावॉट पाठीमागे गावांना 15 हजार रुपये दिले पाहिजे, अशी मागणी आम्ही केली. यामुळे गावांना विकासासाठी लाखो रुपये मिळू लागले, हि देशातील मोठी घटना आहे.
कोयना धरणाला 65 वर्षे झाली, साधे पात्र प्रकल्पग्रस्त कोण आहे ते तीन वर्षे ठरले नाही. बोगस लोकांना जामीनी वाटल्या, कोयना धरणग्रस्तांना राखीव ठेवलेल्या जमीनीत इतर लोकांना घुसवले आहे, पुढच्या आठवड्यात पर्यंत सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी. तुम्ही शब्दाला जागले पाहिजे, कष्टकरी माणसांच्या डोळ्यांतील आश्रुंचा निखारे झाल्यापासून राहणार नाही. हा लढा 14 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे, अख्खा महाराष्ट्रात आटपाडी पॅटर्न लागू केला जावा नाही केला तर 14 नव्हेबर पासुन सगळे दुष्काळग्रस्त जनता आपल्या भागात बेमुदत ठिय्या आंदोलन करतील.
प्रस्ताविकात संतोष गोटल यांनी 1980 साली डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक मुक्ती दलाची स्थापना झाली. आजवर राज्यातील प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न, स्त्रियां, दलित, अल्पसंख्याक, शेतमजूर, कामगार यांच्या न्याय हक्कासाठी संघटनेने आंदोलनांच्या माध्यमातून लढा दिला असल्याचे सांगितले. यावेळी पंजाबराव पाटील, सुभेदार मेजर सुखदेव ,गणेश बाबर, अंकुश शेडगे, मोहन अनपट, अॅड शरद कांबळे, राजन भगत, मनिषा जाधव , आनंदराव जमाले, सुनील दत्त शिंदे , चैतन्य दळवी, आनंदराव (बापू) पाटील, काँम्रेड जयंत निकम यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या प्रारंभीस क्रांतीविरांगणा इंदूताई पाटणकर यांच्या 98 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मेळाव्यात सुरवात झाली. संघटनेचे कार्यकर्ते अॅड धैर्यशील पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. मेळाव्यासाठी सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर, पुणे, मुंबई, पालघर ,रायगड आदी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात करण्यात आलेले ठराव
1)कोयना धरणग्रस्त पात्र लोकांना ठरल्या प्रमाणे लवकरात लवकर जमीन वाटप सुरू करावे.
2)धरणग्रस्त लोकांच्या जमिनीला लवकरात लवकर पाणी मिळावे.
3)पुनर्वसन कायद्या नुसार शासकीय अनुदानित संस्थे मध्ये नोकरी साठीचे 5%आरक्षण लवकरात लवकर सुरू करावे.
4)धरणग्रस्त लोकांच्या मुळावर उठणारा शासकीय निर्णय रद्द करावा .
असे ठराव करण्यात आले.