कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सध्या वाढत असल्याची दिसत आहे. रविवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात 497 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात अचानकपणे दोन दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी जिल्हावासीयांना आवाहनही केले. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता असेल तर घराबाहेर पडावे, अन्यथा पुन्हा कडक स्वरूपाचे निर्बंध लावू , असा इशारा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी वेळेचे निर्बंध घातले आहेत. दुपारी चार वाजल्यानंतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात एका दिवशी जास्त तर एका दिवशी कमी रुग्ण आढळून येत आहेत. याबाबत पालकमंत्री पाटील यांनी चिंता व्यक्त केली असून त्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. “सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना रूग्ण वाढीचा आलेख वाढतच चालला आहे. हा आलेख असाच जर वाढत राहिला तर आपण ज्या पातळीवर आहोत त्यावर बाधितांचा आकडा अधिकच वाढल्यास पुन्हा सातारा जिल्ह्यात कडक निर्बंध लावावे लागतील. त्यामुळे नागरीकांनी गर्दी न करता काळजी घेऊन कोरोनाची मार्गदर्शक नियमांचे पालन करावे तसेच नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.