…तर मशिदींवरील भोगे कार्यकर्त्यांनी काढावे; करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले तर ते करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी काढावेत, असा इशारा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपालसिंह अम्मू यांनी दिला. उच्च न्यायालय ही संवैधानिक संस्था असून निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देश चालतो, उच्च न्यायालयही त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात रविवारी करणी सेनेचे महासंमेलन झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष देवीचंदसिंह बारवाल, माजी खासदार उत्तमसिंह पवार, आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत, शिवचैतन्य महाराज, महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष राखी गर्ग, प्रदेश महिला विभागाच्या ॲड. संध्या राजपूत, बादल सिंग तवर, अमिता शेखावत, पंकजसिंह ठाकूर, बाबा ठाकूर, बाबा परदेशी, मधुकर ढोमसे, सुभाष राठौर, दिनेश राजपूत आदी उपस्थित होते.

सूरजपालसिंह अम्मू यांनी, पोलिस हटवा म्हणणाऱ्या खासदार ओवेसींवर टीका केली. पाच मिनिटे देशातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करा, ओवेसींना पाकिस्तानच्या सीमेवर सोडतो असे ते म्हणाले. ‘हम दो हमारे दो’ हाच न्याय सर्वांसाठी असावा, असा ठरावही महासंमेलनात घेण्यात आला. लोकसंख्या नियंत्रण कायदा अमलात आणला जावा यासाठी लवकरच करणी सेना केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ॲड. आनंदसिंह बायस यांनी सूत्रसंचालन केले. देवीचंदसिंह बारवाल यांनी प्रास्ताविक केले. महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गीत सादर करणारे गायक अमरसिंह रघुवंशी व गायिका संध्या मिश्रा यांचाही सत्कार करण्यात आला.