डॉक्टरशी वाद घालताना रोखल्याने मोडला पाय

औरंगाबाद – डॉक्टरशी वाद घालत असल्यामुळे मित्राला रोखताच त्याने सहा साथीदारांच्या मदतीने बेसबॉलच्या बॅटने मित्राचेच पाय मोडल्याचा धक्कादायक प्रकार हडको, एन-13 भागातील मैदानात घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. न्यायालयाने आरोपींची 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

जटवाडा रोडवरील एका डॉक्टरसोबत अरबाज खान आजम खान (वय 22, रा. बिबी फातेमा मशीदजवळ, एकतानगर, जटवाडा रोड) हा आठ एप्रिलला सायंकाळी वाद घालत होता. त्यामुळे रोहन अनिल बनकर (22, रा. एकतानगर, जटवाडा रोड) या मजुराने डॉक्टरांशी वाद घालू नको असे म्हणत अरबाजला रोखले. याचा राग आल्यामुळे अरबाजने त्याला रात्री एन-13 येथील मैदानात भेटण्यासाठी बोलावून घेतले. तेथे अरबाजने वाद घालत नदीम खान आजम खान (32), सलमान खान आजम खान (30), आजम सरदार खान (27, सर्व रा. बिबी फातेमा मशिदीजवळ, एकतानगर, जटवाडा रोड), विजय जगन दांडगे (18, रा. सिद्धार्थनगर, टीव्ही सेंटर, हडको) आणि अज्जू नवाब पठाण (20, रा. देहाडेनगर, अंबरहिलजवळ, जटवाडा रोड) आणि पसार असलेल्या रितेश साळवेच्या मदतीने बेसबॉलच्या बॅटने रोहनच्या पायावर वार केले.

या मारहाणीत रोहनचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहे. यापूर्वी देखील रोहनला अशाच प्रकारे मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रमसिंह चौहान करत आहेत.