हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| टोलदरवाढीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. आज राज ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यामध्ये त्यांनी टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला. त्याचबरोबर, “टोलनाके बंद केले नाही तर आम्ही ते जाळून टाकू” असा थेट इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला. आता टोलदरवाढीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलदरवाढीचा मुद्दा उचलून धरला आहे. या मुद्द्याला धरूनच आज त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले की, “ठाण्यातील पाच टोलनाक्यांवर दरवाढ झाली, त्याविरोधात मनसे आमदार अविनाश जाधव आणि इतर पदाधिकारी उपोषणाला बसले होते. मी कालही याबाबत बोललो होतो, पण मुद्दाम आज पुन्हा सांगतोय. यासंदर्भात मला राज्य सरकारकडून एक पत्र आला आहे, ज्यामध्ये कोणत्या वाहनांना टोल आहे, कोणत्या वाहनांना टोल नाही हे नमूद करण्यात आल आहे. साधारणतः 2010 मध्ये टोल आंदोलन सुरू झालं. टोलचा सर्व पैसा कॅशमधला पैसा, याचं होतं काय? त्याच-त्याच कंपन्यांना हे टोल कसे मिळतात? शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील मग हा पैसा जातो कुठे?”
…तर टोलनाके आम्ही जाळून टाकू
त्याचबरोबर, “टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मला असं वाटतं याची शहानिशा झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू. नाहीतर आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाहीये, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील आणि टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू” असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील पोलखोल केली. तसेच, आजवर अजित पवार, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टोलनाक्याविषयी कोणती वक्तव्यं केली आहेत यासंदर्भात एक व्हिडीओ क्लिप देखील दाखवली. हा व्हिडिओ दाखवल्यानंतर “हे खरं आहे? हे तर धादांत खोटं बोलतायत. मग हे पैसे नेमके कुठे जातायत?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.