औरंगाबाद – औरंगाबादची पीटलाईन जालन्याला आणलेली नाही. ती औरंगाबादला होणार आहे. परंतु रेल्वेची स्वतःची जागा नसल्याने अडचणी येत आहेत. औरंगाबादच्या विमानतळाचा विस्तार करायचा आहे. त्यालाही जागेचा प्रश्न निर्माण होत आहे. जालन्यात मात्र स्वतंत्र शंभर कोटींची पीटलईन होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. काल जालना येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जालना ते जळगाव हा रेल्वे मार्ग शंभर टक्के होणार आहे. याच्या सर्वेक्षणासाठी टेंडर पास झाले आहे. हा मार्ग चारही विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. शिवाय अहमदनगर, बडोदा, सुरत, बेंगलोर मार्गावर रेल्वे धावणार आहे. मनमाड ते नांदेड मार्गावरील एलेक्ट्रिफिकेशन चे काम सुरू आहे. 2023 नंतर रेल्वे विद्युत वर चालणार असल्याची माहितीही या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
औरंगाबाद येथील रेल्वे पीटलाईन आणि विमानतळाच्या विस्तारीकरणाचे नियोजन आहे. परंतु स्वतःची जागा नसल्याने अडचणी येत आहेत. जागा खरेदी करून पीटलाईन किंवा विमानतळाचे विस्तारीकरण करायचे तर खर्च दुप्पट होणार असल्याचे दांवे म्हणाले. लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. फुलंब्री राजुर मार्गासाठी 85 कोटींचा निधी मंजूर आहे. जालना राजूर मार्गासाठी 260 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही यावेळी दानवे यांनी नमूद केले.