हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणने (MSCB) इतिहासात प्रथमच घरगुती वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना लवकरच वीज कमी दरात (Electricity Rates) मिळणार आहे. विषेश म्हणजे, दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक सवलत देण्याचा प्रस्ताव महावितरणने मांडला आहे. ही योजना एप्रिल २०२५ पासून लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलपासून वीज दरात ८० पैसे ते १ रुपया प्रतियुनिट कपात होऊ शकते. याशिवाय, २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांच्या कालावधीत वीज दरात १२ ते २३ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. तसेच, १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर ५.१४ रुपयांवरून २.२० रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. यासह १०१ ते ३०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी प्रति युनिट दर ११.०६ रुपयांवरून ९.३० रुपयांपर्यंत घसरणार आहे.
दरम्यान, राज्यात सौर ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आल्यामुळे महावितरणला वीजदर कमी करणे शक्य झाले आहे. सौर ऊर्जा स्वस्त असल्यामुळे दिवसा निर्माण होणारी वीज घरगुती ग्राहकांना कमी दरात पुरवली जाणार आहे. त्यामुळे, दिवसाच्या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.
यासोबतच, टाईम ऑफ डे (टीओडी) प्रणालीचा लाभ आता घरगुती ग्राहकांना देखील मिळणार आहे. यापूर्वी ही सुविधा सध्या केवळ उद्योगांना उपलब्ध होती. टीओडी प्रणाली अंतर्गत दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरात विशेष सवलत मिळते. याचा लाभ घरगुती ग्राहकांनाही मिळावा म्हणून महावितरण सर्वसामान्य नागरिकांना मोफत टीओडी मीटर बसवून देणार आहे. याचा मोठा फायदा नागरीकांना होणार आहे.