नवी दिल्ली । राज्ये आणि उद्योग जगताच्या आक्षेपानंतर कपड्यांवरील जीएसटीतील वाढ तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. मात्र, उद्यापासून (1 जानेवारी, 2022) शूज आणि चप्पलवर जीएसटीचे वाढलेले दर लागू होतील. अर्थ मंत्रालयाने 1 जानेवारीपासून कपड्यांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.
विशेष म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयामुळे व्यापारी वर्ग चांगलाच संतापला होता. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ते म्हणतात की,”यामुळे व्यापार कमी होईल, परदेशी कपडे जास्त विकले जातील आणि टॅक्स चोरीही वाढेल.” याबाबत सर्वत्र निदर्शने करण्यात आली. हिमाचल प्रदेशचे उद्योग मंत्री विक्रम सिंह यांनी सांगितले की,”रेडिमेड कपड्यांवरील जीएसटीमध्ये वाढ पुढील बैठकीपर्यंत होणार नाही.”
याच वृत्तानुसार, राजस्थानचे कॅबिनेट मंत्री सुभाष गर्ग यांनी सांगितले आहे की,”कपड्यांवरील जीएसटीचे वाढलेले दर उद्यापासून लागू होणार नाहीत.” फुटवेअरवरील जीएसटी मागे घेण्याचा मुद्दा अजेंड्यामध्ये नव्हता, मात्र तो त्यांनी उपस्थित केला. फुटवेअर दुकानदारांनी सांगितले की, “सरकारने हजार रुपयांच्या शूज आणि चप्पलवरील जीएसटी 12 टक्के केला आहे. यामुळे आमच्या व्यवसायाचा खर्च वाढेल.”