हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे जिल्ह्यातील (Pune District) जमिनीच्या मोजणी प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. भूमि अभिलेख विभागाने मोजणी प्रक्रियेला अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक बनवण्यासाठी ई-मोजणी 2.0 प्रणाली (E-Accounting 2.0 System) लागू केली आहे. याअंतर्गत नागरिकांना आता जमिनीच्या मोजणीसाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नाही. तसेच, ‘क’ प्रत डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे.
पूर्वी नागरिकांना जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज भरणे, शुल्क भरणे, प्रत्यक्ष मोजणीसाठी प्रतीक्षा करावी लागणे आणि मोजणीनंतर ‘क’ प्रत मिळवण्यासाठी महसूल किंवा भूमिअभिलेख कार्यालयांना भेट द्यावी लागत असे. मात्र, ई-मोजणी 2.0 प्रणालीमुळे आता ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदार डिजिटल स्वाक्षरीसह ‘क’ प्रत थेट आपल्या मोबाईल किंवा संगणकावर डाउनलोड करू शकतो.
महत्वाचे म्हणजे, सुरुवातीला राजगड तालुक्यात प्रायोगिक तत्वावर ई-मोजणी 2.0 प्रणाली लागू करण्यात आली होती. तिथे या प्रणालीच्या माध्यमातून मोजणी प्रक्रियेत वेग आणि अचूकता आल्याचे दिसून आल्यानंतर, संपूर्ण पुणे जिल्ह्यात या प्रणालीचा विस्तार करण्यात आला आहे. नवीन प्रणाली अंतर्गत GIS (Geographic Information System) तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक रोव्हर्स वापरण्यात येत आहेत, ज्यामुळे मोजणी अधिक अचूक आणि जलदगतीने पार पडते.
दरम्यान, ई-मोजणी 2.0 प्रणालीमुळे आता अक्षांश आणि रेखांश आधारित डिजिटल मोजणी नकाशे तयार करता येणार आहेत. यामुळे मानवी त्रुटींचा धोका कमी होणार आहे आणि भविष्यात जर दोन मोजण्या झाल्या, तर त्यातील हद्दीतील तफावत सहज समजू शकेल. याशिवाय, नागरिकांना आता कोणत्याही संशयास स्पष्टता आणण्यासाठी डिजिटल ‘क’ प्रत आणि नकाशाची पडताळणी करता येणार आहे.
पूर्वीच्या पद्धतीत मोजणी अहवाल मिळवताना वेळ आणि कागदपत्रांची मोठी दिरंगाई होत असे. मात्र, आता मोजणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीसह ‘क’ प्रत ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या प्रतीत संबंधित जमिनीच्या सीमा स्पष्ट दर्शवण्यात येतील आणि तांत्रिक बाबींसह अधिकृत नकाशा उपलब्ध असेल. म्हणजेच, ई-मोजणी 2.0 प्रणालीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळणार आहे.