हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने जागतिक पातळीवर खेळणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता जागतिक पातळीवर पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची थेट शासन सेवेत नियुक्ती करण्यात येणार आहे. या खेळाडूंची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयाचा लाभ ऑलिम्पिक स्पर्धा, पॅराऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा खेळाडूंना होणार आहे. ज्यांनी अशा स्पर्धांमध्ये पदक मिळवले आहे.
सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुरवणी मागण्या आणि वित्तनियोजन विधेयकावर देखील चर्चा झाली. या बैठकीतच जागतिक पातळीवरील खेळाडूंसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या एका निर्णयामुळे विविध खेळात चांगली कामगिरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना फायदा होणार आहे. कारण, आता स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंच्या हातामध्ये शासकीय रोजगार असणार आहे.
दरम्यान, नुकतेच राज्य सरकारने विश्वविजेता टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिल्याबद्दल 18 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. यासह टीम इंडियामधील मुंबईच्या चार खेळाडूंना एक कोटी रुपयांचे देखील बक्षीस जाहीर केले. हे बक्षीस जाहीर केल्यानंतरच राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीत जागतिक पातळीवरील खेळाडूंसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.