सांगली । सांगली शहरातील शामरावनगर परिसरात असणाऱ्या एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवलेली दीड लाख रुपयांची २१ बोकडे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इलियास हमीद रहिमतपूरे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी चक्क २१ बोकडे लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
इलियास रहिमतपुरे यांचे मटण दुकान आहे. ते पेठभाग येथील खाटीक गल्लीत राहतात. त्यांचे शामरावनगर येथे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये त्यांनी बोकडे ठेवली होती. रात्री गोडावून बंद करून ते घरी निघून गेले. दुसऱ्यादिवशी सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ते दुकान उघडण्यासाठी जात असताना बोकड घेण्यासाठी ते गोडावूनमध्ये गेले असता त्यांना गोडावूनच्या दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पहिले असता गोडावूनमध्ये ठेवलेली २१ बोकडे लंपास झाल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने शेजारी विचारपूस केली असता त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच माहित नव्हते. अखेर त्यांनी याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज द्वारे आता पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’