सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील गोडोली, कोडोली व सदरबझार येथे चोरट्यांनी बंद घरे टार्गेट करून 8 लाख रुपये किमतीच्या सुमारे 22 तोळे दागिन्यांवर डल्ला मारला. दुसरीकडे दोन चोरट्यांनी दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून मंगळसूत्र लंपास केले. दरम्यान, सलग दोन दिवस चोरट्यांनी धुडगूस घातल्याने नारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सौ. विमल बाबुराव माने (वय- 56, रा. यशवंत कॉलनी, गोडोली) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 10 ते 11 या कालावधीत घरफोडी झाली आहे. दि. 11 रोजी दुपारी चोरी झाल्याची घटना समोर आली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते.
कपाटाची पाहणी केली असता त्यातून मोठ्या मण्यांची मोहनमाळ, एक चेन, ब्रेसलेट, तीन वेडणी, एक नेकलेस, दोन बांगड्या, एक गंठण, कानातील फुले व वेल व रोख 30 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. हा सर्व मुद्देमाल सुमारे 20 तोळे वजनाचा असून, त्याची किंमत 7 लाख 10 हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरीची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दुसरी चोरीची घटना सदरबझार येथे घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार भरदिवसा घरफोडी झाली असून, चोरट्यांनी घरातून सुमारे 2 तोळे वजनाचा मुद्देमाल चोरून नेला आहे. घटना समोर आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. तिसरी घटना दि. 11 रोजी खोकडवाडी स्टॉप, कोडोली येथे घडली आहे. महिलेला सोन्याचे मंगळसूत्र पॉलिश करुन देतो, असे सांगून दोन अज्ञातांनी फसवणूक केली. मंगळसूत्र पॉलिश करुन न देता, ते लंपास केले. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.