औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरांपैकी एक असलेल्या उस्मानपुरा भागातील दशमेश नगरात चोरट्यांनी थेट सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच चार दुकाने फोडत पोलिसांना आव्हान दिले आहे. आज पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी भेट दिली.
दशमेश नगर परिसरातील महादेव मंदिरासमोर उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय आहे. या कार्यालयासमोर शॉपिंग कॉम्प्लेक्स सून तळमजल्यावर हेमंत देशपांडे यांचे विनय किचन ट्रॉली नावाचे दुकान आहे. चोरट्याने सुरुवातीला या दुकानाला लक्ष केले. दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी काउंटर मधून तब्बल 93 हजारांची रोकड लांबवली. तसेच दुकानातील साहित्य बाहेर फेकून दिले. यानंतर चोरट्याने शेजारीच असलेल्या संजोग बडवे यांच्या जय ड्रिस्टीब्युटर्स दुकानाकडे मोर्चा वळवला. बडवे यांच्या दुकानांमधून चोरट्यांनी रोख बारा हजार रुपये लांबवले. यानंतर चोरटे काही अंतरावर असलेल्या श्रद्धा मेडिकल या दुकानाकडे वळले. दुकानाचे शटर फोडून त्यांनी गल्यातील रक्कम लांबवली. त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या कामधेनु दूध डेअरीचे शटर फोडून त्यातीलही ऐवज लंपास केला. या दुकानातून नेमका किती ऐवज लंपास झाला हे मात्र समजू शकले नाही.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल धुमे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने भेट दिली. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच चार दुकाने फोडल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हान उभे केले आहे.