कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पोतले (ता. कराड) येथील श्री. स्वयंभू मारुती मंदिरामधील दानपेटी फोडून त्यातील एक ते दीड लाखाची रोकड चोरून नेल्याची तक्रार कराड तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रात्री दीड ते पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. या चोरीमुळे पोतले गावात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पोतले येथील जुने गावठाणात मारूती मंदिर आहे. या मंदिरात देवाला देणगीसाठी पेटी ठेवण्यात आलेली आहे. गुरूवारी मध्यरात्री 1.30 ते पहाटे 2.45 वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली. सकाळी 6. 30 वाजण्याच्या सुमारास गावकरी मंदिरात गेले असता, चोरीची घटना लक्षात आली. यावेळी मंदिरात दानपेटी नसल्याचे लक्षात आले. मंदिराचे कुलुपूही फोडण्यात आले होते. दानपेटी पोतले ग्रामपंचायत कार्यालया शेजारील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या बांधावर आढळून आली. दोनपेटी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली असून त्यामधील साधारण 1 ते दीड लाख रूपयांचे लंपास झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, कोळे दूरक्षेत्राचे अमोल देशमुख, वेदपाठक, डीबीचे उत्तम कोळी, पोतले गावच्या पोलिस पाटील फरजाना मुल्ला आदि उपस्थित होते. मंदिरात चोरीची माहिती मिळताच पोतले गावातील ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली.
नव्या मंदिरातील दानपेटी पळविली
कराड तालुक्यातील श्री. स्वयंभू मारूती मंदिर वर्षभरापूर्वी नव्याने बांधण्यात आले आहे. या मंदिरात दानपेटी ठेवण्यात आली होती. या दानपेटीतील देणगी स्वरूपातील रक्कम मंदिराच्या वर्धापनदिनी काढायची होती. परंतु त्या अगोदर चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला.