कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
कराड शहराजवळील कोयना वसाहत परिसराला मंगळवारी रात्री चोरट्यांनी टार्गेट केले. बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. तर लाखों रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याचे फ्लॅट मालकांनी सांगितले. आज सकाळपासून कोयना परिसरात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोयना वसाहत येथील पाच मंदिर परिसरात रात्रभर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका रात्रीत तब्बल तीन बिल्डिंग मधील बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लोक बाहेरगावी गेल्याचे पाहून चोरट्यांनी हात साफ केला आहे. कोयना वसाहत मधील राजगड या बिल्डिंग मधील अमित महापुरे यांच्या फ्लॅटची कडी तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. फ्लॅटमधील साहित्य विस्कटून टाकले तसेच लाखों रूपयांचे सोन्यावर डल्ला मारला. संबधित फ्लॅटचे मालक मंगळवारी सायंकाळी कुटुंबासमवेत कोल्हापूरला गेले होते.
दरम्यान, शेजारी असणाऱ्या दोन बिल्डिंगमधीलही फ्लॅट चोरट्यांनी फोडले. मात्र, त्या ठिकाणी कुणीच राहत नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनेची माहिती आज सकाळी कराड शहर पोलीसांना मिळताच पीएसआय राज पवार, नितीन येळवे, प्रफुल्ल गाडे, पोलीस कर्मचारी संजय जाधव व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलिस घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करत आहेत.