हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षी सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला अफजल खानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. हे अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी अफझल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी सापडल्या आहेत. त्यातील एक कबर अफझल खानाच्या सेवेकऱ्याची तर दुसरी कबर सय्यद बंडाची असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तिसरी कबर कुणाची? असा सवाल केला जात असतानाच संभाजी ब्रिगेडने याबाबत मोठा दावा केला आहे.
प्रतापगडच्या पायथ्याशी सापडलेली तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचीच असल्याचा मोठा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अफजल खान याचा वध केला तेव्हा त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याने शिवाजी महाराजांवर वार केला होता. त्यामुळेती तिसरी कबर त्यांचीच असावी असं संतोष शिंदे यांनी म्हंटल आहे.
छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास जपला पाहिजे हा सांस्कृतिक दहशतवाद मुक्तीचा इतिहास आहे. राज्य सरकारने इतिहास संशोधकांच्या मदतीने या सर्व कबरींचा तपास करावा. व या कबरी नेमक्या कोणाच्या आहेत, हे शोधून काढावे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे असेही संतोष शिंदे यांनी म्हंटल. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.