काबूल । अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर येथील परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. इस्लामिक स्टेटच्या आत्मघाती हल्लेखोरांनी गुरुवारी संध्याकाळी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर तीन स्फोट केले. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 105 पेक्षा जास्त लोकं मारले गेले. इस्लामिक स्टेटशी संलग्न ‘इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत’ (ISKP) ने विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इस्लामिक स्टेटने आता दोन हल्लेखोरांपैकी एकाचा फोटो आणि नाव जगासमोर उघड केले आहे. अब्दुल रहमान अल-लोगारी असे या हल्लेखोराचे नाव आहे, ज्याद्वारे केल्या गेलेल्या आत्मघाती हल्ल्यात अनेक निष्पाप लोकं मारले गेले आहेत.
ISKP ने शेअर केलेल्या या फोटोमध्ये लोगारी इस्लामिक स्टेटच्या झेंड्यासमोर हातात बंदूक घेऊन थांबलेला दिसू शकतो. या दरम्यान, हल्लेखोराच्या छातीवर बांधलेला स्फोटक बेल्ट देखील दिसू शकतो. लोगारीच्या चेहऱ्यावर एक काळे कापड बांधलेले आहे आणि त्याचे फक्त डोळेच दिसत आहेत. मात्र, ISKP ने दुसऱ्या हल्लेखोराचा फोटो अजून जारी केलेला नाही.
अमेरिकन सैनिकांच्या जवळ स्वतःला उडवले
इस्लामिक स्टेटने म्हटले आहे की,” अब्दुल रहमान अल-लोगारी हा अमेरिकन सैन्यापासून पाच मीटरच्या अंतरावर होता. या दरम्यान, अमेरिकन सैनिक कॉन्ट्रॅक्टर आणि ट्रान्सलेटर्सकडून कागदपत्रे गोळा करत होते. हल्लेखोर तालिबान आणि अमेरिकेच्या सुरक्षा चौक्यांना सहजपणे ओलांडून सैनिकांच्या इतक्या जवळ पोहोचला. त्याच वेळी, जेव्हा हल्लेखोराने पाहिले की, तो सैनिकांच्या इतक्या जवळ पोहोचला आहे, तेव्हा त्याने स्वतःला बॉम्बने उडवून दिले. स्फोटानंतर विमानतळाबाहेर गोंधळाचे वातावरण झाले. लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धाव घेण्यास सुरूवाट केली.
या स्फोटांनी अमेरिकेला हादरवून सोडले. व्हाईट हाऊसमधून पत्रकारांना संबोधित करताना, अध्यक्ष जो बिडेन यांनी शांततेत थोडक्यात डोके टेकवले आणि नंतर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मृत्यू पावलेल्या ‘हिरों’ बद्दल बोलताना, ते काही वेळा भावनिक होताना दिसले आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. मात्र, जेव्हा त्यांनी हल्लेखोरांना शोधून फाशी देण्याविषयी सांगितले, तेव्हा त्यांच्या आवाजात खूप खंबीरपणा होता. तसे, काबूल विमानतळाच्या स्फोटाच्या घटनेने राष्ट्रपती म्हणून बिडेन यांना हादरवून टाकले आहे यात शंकाच नाही.