कराड | कुसूर (ता. कराड) येथील श्री सदगुरू गाडगे महाराज विद्यालय व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने दिला जाणारा यंदाचा मुकादम साहित्य पुरस्कार डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील यांनी लिहिलेल्या “ऊसकोंडी” या ग्रंथास जाहीर झाला आहे. कुसूर येथे 29 जानेवारीला मुकादम तात्याच्या जयंतीदिनी 42 व्या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संयोजकानी पत्रकाद्वारे दिली.
कुसूर येथील श्री स. गा. महाराज विद्यालय व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघच्यावतीने प्रतिवर्षी मुकादम साहित्य पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदाही पुरस्काराचे आयोजन त्याठिकाणी झाले आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे साहित्य पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी उपराकार लक्ष्मण माने, सिंधुताई सपकाळ, नरेंद्र जाधव, शंकरराव खरात, विश्वास पाटील, डॉ.राजन गवस, डॉ.श्रीपाल सबनीस, उत्तम कांबळे,नागनाथ कोतापल्ले, डॉ. आर. ए. कुंभार व प्राचार्य विजय नलावडे हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
यंदाच्या 42 व्या पुरस्काराचे वितरण त्याठिकाणी होत आहे. रविवार ता. 29 रोजी दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादमतात्या यांच्या 122 व्या जयंतीदिनी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्च) प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या अध्यक्षतेखाली माजी प्राचार्य रविंद्र येवले संस्थेचे सहसचिव (माध्यमिक) आर. एस. साळुंखे यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थीत वरील पुरस्काराचे वितरण होईल. यासह ए. डी. आत्तार आदर्श शिक्षक पुरस्कार किडगांव येथील भैरवनाथ विद्यालयाचे उपशिक्षक अनिल पवार यांना तर चैतन्य पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे उपशिक्षक अविनाश साळुंखे यांना प्रधान करण्यात येणार आहे. असी माहिती संयोजकानी पत्रकाद्वारे दिली. पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.