औरंगाबाद – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सलीम अली सरोवरातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. दूषित पाण्यामुळेच या माशांचा मृत्यू झाले असल्याचे बोलले जाते. यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत. वारंवार असे प्रकार घडूनही मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळेच ही घटना घडली. अशी चर्चा परिसरात ऐकायला मिळाली.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या सलिम अली सरोवरात सध्या येथे पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. अनेक विविधतेने नटलेले हे सरोवर असून, येथे अनेक जलजि वांचा वास आहे. दरवर्षी नेहमी याच कालावधीत सरोवरातील माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडते. रविवारी देखील सरोवरातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. यापूर्वी देखील अशा घटना घडलेली असल्याने महापालिकेने वेळीच खबरदारी घेणे अपेक्षित होते. परंतु याकडे मनपा प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले. यामुळेच हा प्रकार घडला असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
सरोवरात ड्रेनेजचे पाणी
सरोवरात आसपासच्या वसाहतींतील ड्रेनेजचे पाणी मिश्रित होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळेच पाणी दूषित होऊन माशांचा मृत्यू झाला का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. परिसरात ड्रेनेजचे पाणी काही प्रमाणात येते.
तज्ञांकडून माहिती मागवत आहोत- पाटील
पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे देखील अशी घटना घडू शकते. घडलेल्या प्रकाराबाबत तज्ञांकडून माहिती मागत आहोत. ती माहिती आल्यानंतरच माशांचा मृत्यू का झाला ? हे स्पष्ट होईल, असे मनपा उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी यावेळी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा