हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडमधील (Nanded) लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामांच्या पालखीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात हजारो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात महाप्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक वेगवेगळ्या ठिकाणाहून याठिकाणी आले होते. मात्र मंगळवारी रात्री महाप्रसादात भगर खाल्ल्यामुळे सर्वांना विषबाधा झाली. यानंतर त्रास होत असलेल्या सर्व व्यक्तींना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
भगर खाल्ल्याने त्रास
मंगळवारी लोहा तालुक्याच्या कोष्टवाडी या गावामध्ये बाळूमामाच्या पालखीचे मोठे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता. त्यामुळे हा महाप्रसाद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक याठिकाणी आले होते. मंगळवारी महाप्रसादात भगर ठेवण्यात आली होती. हजारो लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मात्र रात्री दोन वाजल्यापासून अनेकांना चक्कर येणे, उलट्या होणे, डोके दुखणे असे त्रास होऊ लागले. त्यामुळे या सर्वांना लोहा शहरातील खाजगी आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
समोर आलेल्या माहितीनुसार, रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर या सर्व घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व प्रकरणाची माहिती घेतली. तसेच काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर पोलिसांच्या मदतीने एसटी बस, खाजगी वाहने, ट्रॅव्हलर्स, जीप बोलावून घेण्यात आली. या वाहनांमध्ये रुग्णांना टाकून त्यांना उपचारासाठी परभणीकडे पाठवण्यात आलं. सध्या विषबाधा झालेले अनेक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर पोलीस हा सर्व प्रकार कसा घडला याचा तपास करीत आहेत.