कराड | येथे रात्रगस्त पोलिस पथकाने मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. संशयितांकडून 59 हजार 148 रुपयांच्या रोख रकमेसह, मोबाईल संच असा मिळून सुमारे 1 लाख 25 हजार 198 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. साहिल विजय देशमुख (वय- 21, मूळगाव कडेपूर ता. कडेगाव, हल्ली रा. गारवडे, ता. पाटण) यासंह दोन अल्पवयीन मुले अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज हद्दीत पहाटेच्या सुमारास रात्रगस्त नाकाबंदी करणारे सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय देवकुळे, चालक कॉन्स्टेबल सचिन देशमुख, दत्तात्रय लवटे यांना संशयित हे महामार्गावरून जात असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने उंब्रजच्या येथे एका दुचाकीवरून तिघे जण स्वतःचे अस्तित्व लपवून, चेहरा झाकलेल्या अवस्थेत सेवारस्त्यावरून कऱ्हाड बाजूकडे जाताना दिसले. या वेळी त्यांना हात करून थांबण्याचा इशारा दिला. मात्र, संशयित तसेच पुढे भरधाव वेगात निघाल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. या वेळी महात्मा गांधी महाविद्यालयाजवळ पोलिसांनी त्यांना थांबवून ताब्यात घेऊन विचारपूस केली. या वेळी संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पाडळी येथील श्री गणेश मंदिरात करून दानपेटी फोडलेली असल्याचे संशयितांनी कबूल केले.
या वेळी दुचाकी, तसेच तिला अडकविलेली लोखंडी कटावणी, दोन मोबाईल संच व पैशाची चिल्लर व नोटा अशी 59 हजार 148 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल संच असा मिळून सुमारे 1 लाख 25 हजार 198 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांनी उंब्रज पोलिस ठाणे हद्दीतील मसूर फाट्याचे श्री मायाक्का मंदिर, भोसलेवाडीचे श्री गोपालनाथ मंदिर, तळबीड, बोरगाव, पाटण, कराड, कडेगाव, शिराळा, इस्लामपूर अशा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मंदिरांमध्ये दानपेट्या फोडून चोऱ्या केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे.