कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
सुपने (ता. कराड) येथे उसाच्या फडात ग्रामस्थांना बिबट्याची तीन बछडी आढळून आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने त्याठिकाणी धाव घेऊन बछड्यांना सुरक्षितरीत्या त्याचठिकाणी ठेवले. त्यानंतर रात्री उशिरा मादी बिबट्याने तिन्ही बछड्यांना तेथून आपल्यासोबत नेले.
सुपने येथील कुबेर बाळकृष्ण पाटील या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात बिबट्याची आठ ते दहा दिवसांची तीन बछडी आढळून आली. बछडी दिसताच शेतकऱ्यांनी तेथून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. तसेच याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याठिकाणी भेट देऊन तिन्ही बछड्यांना ताब्यात घेतले. तसेच ज्या शेतात बछडी सापडली, त्याचठिकाणी त्यांना सुरक्षितरीत्या ठेवले. बछड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याने तिन्ही बछड्यांना आपल्यासोबत नेले.
खबदरदारीची सूचना
सुपने येथे बिबट्या अथवा बछडी ग्रामस्थांना पुन्हा निदर्शनास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी. बिबट्याला हुसकावण्याचा अथवा बछड्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.