औरंगाबाद – शहराजवळच असलेल्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पार्किन्स कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खासगी बसला शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आग लागली. ही घटना सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते जय भवानी नगर रस्त्यावर घडली यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबून कामगारांना बसमधून उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण बस आपल्या कवेत घेतली. या आगीच्या मिळालेल्या माहितीनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवली खरी, मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून कोळसा झाली आणि बसचा सांगाडाच त्या ठिकाणी राहिला होता.
औरंगाबादेत मध्यरात्री'द बर्निंग बस'चा थरार pic.twitter.com/9wXqVHFTBn
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 19, 2021
प्राप्त माहितीनुसार, बसचे चालक कुरेशी हे शनिवारी मध्यरात्री एक वाजता शेंद्रा एमायडिसी मधील पार्किन्स कंपनी च्या दुसऱ्या पाळीच्या कामगारांना घेऊन शहरात आले. सदर बस सिडको 2 मधील महालक्ष्मी चौकातून जय भवानी नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर येताच इंजिन मधून धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बस उभी केली आणि कामगारांना बसमधून उतरवले आणि स्वतःही बाहेर पडला.
धूर निघाल्याचे समजतात त्यांनी माती टाकून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर काहींनी अग्निशामक दलाला संपर्क केला. तेव्हा चिकलठाणा एमआयडीसी मधून एक बंब तेथे दाखल झाला तोपर्यंत मात्र आगीने संपूर्ण बसला वेढा दिला होता. पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर आणि कर्मचाऱ्यांनी शेजारील रुग्णालयातून पाणी मिळवून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.