औरंगाबाद – एसटी महामंडळात खाजगी चालकांपाठोपाठ आता खाजगी वाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच एसटीत खाजगी वाहक प्रवाशांना तिकीट देताना पाहायला मिळतील. या सगळ्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा प्रकार सुरू असल्याने खाजगी चालक रडारवर आले आहेत.
एसटी शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहेत. यात चालक-वाहकांची सर्वाधिक संख्या आहे. यावर पर्याय म्हणून महामंडळाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. खासगी पुरवठादार याच्या शिवनेरी आणि शिवशाही बसद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा संपा दरम्यान एसटी महामंडळाने पुरवठादारामार्फत खाजगी चालकांची ही नियुक्ती केली आहे. खाजगी चालक अनेक मार्गांवर कर्तव्य देखील बजावत आहेत. मात्र खासगी बसेस वरील चालक आणि पुरवठादारामार्फत नियुक्त केलेल्या चालकांकडून बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. विनातिकीट प्रवासी घेऊन पैसे वसूल केले जात असल्याचा प्रकार महामंडळाच्या निदर्शनास आला आहे. उत्पन्नावर परिणाम होत असल्याने ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे.
मार्ग तपासणी पथके कार्यान्वित करून, बसची तपासणी करण्याची सूचना महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना केली आहे.