कोल्हापूर । जिल्ह्यातील ‘राधानगरी वन्यजीव अभयारण्या’त पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. वन विभागाकडून लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे.
पश्चिम घाटामधील जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट मानल्या जाणाऱ्या ‘राधानगरी अभयारण्या’त वाघाच्या वावराची नोंद करण्यात आली आहे. सह्याद्रीतील वाघांचा अधिवास हा फार गुप्त स्वरुपाचा आहे. हाताच्या बोटाच्या मोजण्याइतकेच वाघ सह्याद्रीत अधिवास करतात. अशा परिस्थितीत राधानगरीत झालेली वाघाची नोंद महत्त्वपूर्ण आहे. ‘राधानगरी अभयारण्य’ प्रशासनाकडून वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कॅमेरा ट्रॅप खरेदीकरिता निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून १०० ट्रॅप कॅमेरे खरेदी करण्यात आले. ११ एप्रिल रोजी सर्व वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जंगलात मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले.
या कॅमेरा ट्रॅपमध्ये २३ एप्रिल रोजी पूर्ण वाढ झालेल्या पट्टेरी वाघाचे छायाचित्र कैद झाल्याची माहिती ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’चे संचालक आणि वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी दिली. प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्ट्यांची रचना निरनिराळी असते. राधानगरीत छायाचित्रित झालेल्या वाघाचे छायाचित्र हे सॉफ्टवेअरवर टाकून कर्नाटक व गोवा या राज्यातील वाघांशी जुळवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर छायाचित्रातील पट्ट्यांची रचना जुळली, तर सदर वाघ हा स्थलांतरित होऊन आलेला आहे असा निष्कर्ष काढण्यात येईल, असे लडकत यांनी सांगितले. तर राधानगरीत २०१२ पासून चौथ्यांदा वाघाचे छायाचित्र टिपण्यात आल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही क्लेमेंट बेन यांनी सांगितले.
प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये साहेब यांनी राधानगरीचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांना अधिक सतर्क राहून जास्त निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राधानगरीतील वाघाचा वावर हा ‘सह्याद्री व्याघ प्रकल्पा’च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण, सद्यपरिस्थतीत व्याघ्र प्रकल्पात वाघाचा वावर वा अधिवास नाही. प्रकल्पामध्ये वाघ स्थलांतरित होण्याचा एकमेव मार्ग हा राधानगरी ते तिलारी दरम्यान असलेला सह्याद्री-कोकण वाईल्डलाईफ काॅरिडोर आहे. अशा परिस्थितीत राधानगरीत वाघाचा वावर हा सह्याद्रीतील व्याघ्र अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शिवाय हा वावर अबाधित ठेवण्यामध्ये तिलारी, आंबोली, चंदगड आणि आजरा काॅन्झर्वेशन रिझर्व्हचा देखील महत्त्वपूर्ण वाटा आहे.