औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरील सभेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त असणार आहे. यासाठी जवळपास तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असून आज बाहेरील जिल्ह्यातील अतिरिक्त कुमक दाखल होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा आयोजित केली आहे. या सभेला विविध पक्ष, संघटनांनी विरोध दर्शविला आहे तर काही संघटनांनी सभा उधळून लावण्याचीही धमकी दिली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सभेला परवानगी दिली नव्हती. मात्र, पोलिस आयुक्तांनी आढावा घेतल्यानंतर 28 एप्रिल रोजी सभेसाठी सशर्त परवानगी दिली. पोलिसांनी काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांची सुरक्षा योजना सांगितली. या योजनेनुसार सभा पुढे गेली पाहिजे अशा सूचनाही पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या सभेसाठी 1 पोलीस आयुक्त, 08 पोलीस उपायुक्त, 12 सहाय्यक आयुक्त, 52 पोलीस निरीक्षक, 156 एपीआय-पीएसआय, 2000 पोलीस कर्मचारी, 600 एसआरपीएफ कर्मचारी असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर सभेसाठी बाहेरच्या जिल्ह्यातील पाच पोलिस उपायुक्त, 8 सहाय्यक पोलीस आयुक्त, 350 पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या 6 तुकड्या येणार आहेत.