औरंगाबाद – शहरात मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या महापालिकेने हालचाली सुरू केल्या होत्या. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी पीएमसी नियुक्त करण्याची फाईल, लेखा विभागात अडकली होती. लेखा विभागाने या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा, असा शेरा मारून फाईल शहर अभियंता विभागाकडे पाठविली आहे. दरम्यान महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता ही फाईल स्मार्ट सिटी अभियानाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडोरमुळे आगामी काळात औद्योगीकरण वाढणार आहे. वाढत्या नागरीकरणासाठी वाहतुकीच्या सोयी-सुविधा पुरविणे गरेजेच आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व नागपूर, नाशिक पाठोपाठ औरंगादेतही मेट्रोसेवा सुरू करण्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात वाळूज ते ऑरिकसिटी या दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी मेट्रोचा डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यासाठी पीएमसीची नियुक्ती करण्याची फाईल महापालिकेच्या लेखा विभागात काही दिवसांपासून पडून होती.
आता ही फाईल लेखा विभागाने शहर अभियंता विभागाकडे पाठवीत, पीएमसीसाठी द्यावा लागणारा खर्च महापालिकेला परवडणार नाही. त्यामुळे वरिष्ठस्तराव निर्णय घ्यावा, असा शेरा लिहला आहे. दरम्यान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पीएमसी नियुक्तीची फाईल स्मार्ट सिटीकडे पाठविली आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीने पीएमसी नियुक्तीची तयारी सुरू केली आहे. लवकरच मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.