कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
तब्बल दोन वर्षांनी यंदा गणेश जयंती साहेळा मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असल्याने अवघे जनजीवन बाप्पामय होवून गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु उत्सवाची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचल राहणार आहे. कोरोना पश्चात यावर्षी पहिल्यांदाच निर्बंध मुक्त गणेश जयंती साजरी होत असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे.
आज गणेश जयंती असल्याने जन्मसोहळ्याला विविध गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी होणार आहे. जयंतीनिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश मंदिरांना रंगरोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परिसरामध्ये पथकांची सजावट करण्यात आली आहे. जन्म सोहळ्यासाठी पाळणा सजवण्यात आले आहेत. मंदिर परिसरात मोठे सभामंडप उभारण्यात आले आहेत. गणेश जयंतीच्या या सर्व तयारीमुळे जिल्ह्यात अवघे जनजीवन बाप्पामय झाले आहे. काही मंदिरांमध्ये दोन- तीन दिवसांपासून पारायण, हरिनाम सप्ताह सुरू असून गणेश जयंतीला त्याचा समारोप होणार आहे. जयंतीनिमित्त सर्वच गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचे राहणार असून काही ठिकाणी विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सातारा शहरात फुटका तलाव गणेश मंदिर, शकुनी गणेश मंदिर, कुबेर विनायक मंदिर, अजिंक्य गणेश मंदिर, पंचमुखी गणपती मंदिर जिल्ह्यातील अंगापूर, वाईतील महागणपती यासह कराड शहरातील शुक्रवार पेठ, मुख्य बाजारपेठेतील मंदिर, गजानन हौसिंग सोसायटी गणेश मंदिर, कोळे, किरपे, शेणोली व मसूर (हेळगाव), पाटण तालुक्यातील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थळावरील मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचसोबत आकर्षक विद्युत रोषणाईही पहायला मिळत आहे.